कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००९ ते २०१५ या सहा वर्षांच्या काळात प्रशासकीय कारकीर्द होती. प्रशासकाच्या काळानंतर गेल्या सात वर्षांत या बँकेने केलेली प्रगती देदीप्यमान आहे, असे गौरवोद्गार सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी काढले. सहकारातील शेतकरी सभासदांच्या विकास सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक व राज्य सहकारी बँक या त्रिस्तरीय रचनेमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे कामकाज गौरवास्पद आहे, असेही ते म्हणाले.

आयुक्त श्री. कवडे यांच्यासह अपर आयुक्त शैलेश कोथमिरे, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, लेखापरीक्षणचे विभागीय सहनिबंधक छत्रीकर या अधिकाऱ्यांची जिल्हा बँकेत आढावा बैठक झाली. यावेळी बँकेच्या ‘भीम ॲप’चे अनावरण आयुक्त कवडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती व विविध योजनांचे सादरीकरण केले.

बँकेचे संचालक व आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, बँकेचे अध्यक्ष आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गरुडझेप घेतली आहे. संचालक प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, जिल्हाभरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गावातीलच मायक्रो एटीएममधून अंगठ्याद्वारे पेन्शन मिळण्याची व्यवस्था बँक राज्य बँकेमार्फत करीत आहे. तसेच नोटाबंदीच्या काळातील २५ कोटींच्या नोटा बँकेकडे पडून आहेत. त्या रिझर्व्ह बँकेने परत घेण्यासाठी सहकार विभागाने पाठपुरावा करावा. बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, सहकार आयुक्तानी केलेल्या सूचनांची बँक पूर्तता करेल.

डिजिटल बँकिंग प्रगतीमधील टप्पे

भीम ॲप ही विनामूल्य सेवा प्ले स्टोअरवर उपलब्ध. २०१३ साली शंभर टक्के कोअर बँकिंग व २०१९ साली स्वतःचा सीबीएस प्रकल्प हाती घेतला. रुपे कार्ड, ३२ एटीएम केंद्रे, मोबाईल बँकिंग, यूपीआय, मायक्रो एटीएम, चार मोबाईल व्हॅन या डिजिटल सुविधा कार्यान्वित. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या प्राधिकरणाकडून भीम ॲपला मंजुरी. ३२ हजारपेक्षा अधिक ग्राहक यूपीआय सेवा वापरत आहेत. ग्राहकांना २४ तास आयएफएससी कोड व बँक खाते नंबरशिवाय व्यवहार करता येणार. क्यूआर कोड, मोबाईल नंबरद्वारेही पैशाची देवाण-घेवाण चालणार. ३२ एटीएम व ३९७ मायक्रो एटीएमच्या माध्यमातून गावपातळीवरही सुविधा. दूध बिलेही मिळतात गावातच. लवकरच अंगठा लावूनही करता येणार व्यवहार.

यावेळी आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. निवेदिता माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणवीरसिंग गायकवाड, सुधीर देसाई, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वाती कुंभार यांनी केले.