मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील एसटी कामगारांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढू लागली आहे. यावर आता मार्ग काढण्यासाठी सरकारने विविध पर्यायावर विचार सुरू केला आहे. त्यातच एसटी महामंडळाचे खासगीकरण कऱणे, हा एक मुद्दा समोर आला आहे. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाष्य केले आहे.  

मंत्री परब म्हणाले की, सध्या समोर आलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हा एक पर्याय आहे. मात्र, खासगीकरणाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. इतर राज्यांतील परिवहन महामंडळांचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला असून त्यांच्याकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.

एसटी महामंडळाचे खासगीकरण कऱण्यावर अद्याप विचार केलेला नाही. मात्र, वेगवेगळ्या पर्यायांपैकी हा एक पर्याय असू शकतो. मात्र, या पर्यायावर सध्यातरी विचार नाही. कर्मचारी त्यांच्या भूमिकेवर ठाम असून सरकार म्हणून लोकांची जबाबदारी आमच्यावर आहे. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी आमचीच आहे. त्यासाठीच मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु केला आहे, असे परब यांनी सांगितले.