इचलकरंजी (प्रतिनिधी) :  शासनाने कंत्राटी पध्दतीने माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, हा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घ्यावा आणि ही नोकरभरती अनुकंपा तत्वावर करावी. अशी मागणी माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या अन्यायविरोधात एकजुटीने न्याय-हक्काचा लढा उभारुन तो यशस्वी करण्याचा निर्धारही करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उदघाटन व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक खोत यांच्या हस्ते आणि संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष श्रीधर गोंधळी यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली करण्यात आले. तर संघटनेचे मुख्य प्रवर्तक नंदकुमार पाटील, संघटक तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष शिवाजी वरपे, कार्याध्यक्ष अजित गणाचारी, सचिव कृष्णात पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चर्चासत्रामध्ये माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी नोकर भरतीबाबत शासनाने घेतलेले कंत्राटी पध्दतीच्या चुकीच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती कंत्राटी पध्दतीने न करता चिपळूणकर समितीच्या शिफारशीनुसार व्हावी, कालबध्द पदोन्नती मिळावी, अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या इचलकरंजी शहर परिसर शाखेचे पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष बालन पोवार, कार्याध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष कपिल पवार, सचिव अनिल कोळी, विठ्ठल जावळे, सर्जेराव शिंदे, प्रदीप घोरपडे, राकेश पवार, धनाजी धनगर, अविनाश पवार, प्रकाश मेघाडी आदी उपस्थित होते.