टोप (प्रतिनिधी) : चालकाचा ताबा सुटल्याने खाजगी प्रवासी बसने पुणे-बंगळुरू महामार्गावर नागांव फाट्याजवळील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या तीन दुकानांना जोराची धडक दिली. यामुळे या दुकानांचे १२ ते ‍१३ लाखांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज (सोमवार) पहाटे ४ च्या सुमारास घडला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

आज पहाटे खाजगी प्रवासी बस (क्र. एम एच ४७ वाय ७६४९) पुण्याहून कोल्हापूरकडे जात होती. चालक सुभाष मारुती जाधव याचा ताबा सुटल्याने बस सेवा रस्त्यालगत असलेल्या नितिन किसनलाल ओसवाल यांचे फरशी दुकानाच्या कंपौंडमध्ये घुसली. बसचा वेग जास्त असल्याने त्या दुकानालगतच्या इनसबर्ग कंपनीचे लाईट डिजिटल बोर्ड तोडून जवळच्या बिअर शॉपीमध्ये घुसली. यामध्ये ओसवाल यांच्या महागड्या फरश्या फुटल्या तर लाईट बोर्ड आणि बिअर शॉपीतील पाण्याच्या टाकीसह इतर साहित्य असे १२ ते ‍१३ लाखांचे नुकसान झाले आहे. बसचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.