सुरळीत वीजपुरवठ्यासह नवीन वीजजोडणीसाठी प्राधान्याने उपाययोजना करा : असीम कुमार गुप्ता

0
49

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनलॉकमुळे जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे प्रामुख्याने लघू आणि मोठ्या उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करावी, असे निर्देश ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम कुमार गुप्ता यांनी दिले.

पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा तसेच नवीन वीजजोडणीसंदर्भात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती) आणि अंकुर कावळे (प्रभारी, कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुप्ता म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना करीत आणि सावधगिरी बाळगत सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे जनजीवनासह लहान-मोठ्या उद्योगांचे चक्र पूर्वपदावर आले आहे. सोबतच विजेची मागणी देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लघू आणि मोठ्या उद्योगांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यकता असल्यास तातडीने कृती आराखडा तयार करून मुख्यालयात पाठविण्यात यावा, असे निर्देश गुप्ता यांनी दिले.

तसेच प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञानसह इतर क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत राहील, याची प्राधान्याने काळजी घ्यावी. तसेच त्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून ठेवावी. यासोबतच लघू आणि मोठ्या उद्योगांसह घरगुती आणि वाणिज्यिक वर्गवारीतील नवीन वीजजोडण्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतरची प्रक्रिया आणखी वेगवान करण्यात यावी, अशा सूचना असीम कुमार गुप्ता यांनी दिल्या. या आढावा बैठकीत पुणे प्रादेशिक विभागातील अधिक्षक अभियंता आणि इतर वरिष्ठ अधिकार उपस्थित होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here