प्राध्यापकाचा निर्वाह भत्ता नाही दिला, मग प्राचार्यांचाही पगार रोखला… : चंदगडमध्ये खळबळ

0
620

चंदगड  (प्रतिनिधी) : चंदगडमधील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. गुंडूराव कांबळे यांचे विनयभंगप्रकरणी सुमारे चार वर्षांपूर्वी निलंबन करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना निलंबन भत्ता न दिल्याच्या कारणामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांचे विभागीय सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी नोव्हेंबरपासूनचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले आहेत. प्राचार्यांचा पगार थांबविण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याच्या चर्चेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डिसेंबर २०१६ रोजी प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे यांचे विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये निलंबन करण्यात आले आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे. विद्यापीठाच्या सुधारित कायद्यानुसार कायमस्वरूपी असणाऱ्या प्राध्यापकांना निलंबन केल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्याच्या काळात अर्ध्या पगार, त्यानंतर एक वर्षांपर्यंत ७५℅ आणि एक वर्षानंतर पूर्ण पगार द्यावा अशी तरतूद आहे. तसेच एक वर्षापुढे निलंबन ठेवायचे नाही असे बंधनकारक आहे. असे असताना डिसेंबर २०१६ पासून कांबळे याना निलंबन निर्वाह भत्ता दिला नाही. त्यामुळे कांबळे यांनी विद्यापीठ व शिक्षण विभागाकडे या संदर्भात मागणी केली होती. तसेच आ. प्रकाश आबिटकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती.

त्यामुळे तातडीने निलंबन भत्ता द्यावा असे आदेश विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाने प्राचार्याना दिलेले असून देखील जाणीवपूर्वक निर्वाह भत्ता न दिल्याने विभागीय सहसंचालक विभागाने प्राचार्य डॉ. पाटील यांचा नोव्हेंबरपासूनचा पगार थांबविला आहे. त्यामुळे आता शिक्षण क्षेत्रात हा चर्चेचा विषय ठरून खळबळ उडाली आहे. डॉ. पाटील ३० डिसेंबरला नोकरीतून कार्यमुक्त होत आहेत. संस्थेवरसुद्धा कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा केली जात आहे.