पुण्यातील पंतप्रधान मोदींचे मंदिर रातोरात हटविले 

0
161

पुणे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री कार्यालयाकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून कानउघडणी केल्यानंतर पुण्यातील औंधमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर रातोरात हटविण्यात आले. मोदींचा पुतळा भाजप नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनंतर तत्काळ हा पुतळा हटविला.

औंधमधील एका मोदी भक्तांने प्रधानमंत्री मोदी यांचे मंदिर उभारले होते. यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधी पक्षांनीही टीकेची झोड उठवली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत कठोर शब्दांत सूचना केल्याचे समजते. अखेर हे मंदिर हटविण्याचा रातोरात निर्णय घेण्यात आला.

देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हे पहिलेच मंदिर असल्याचे दावा केला होता. जयपूर येथून मोदींचा मार्वल पुतळा तयार केला होता. यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च आला होता. मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता येथील फलकावर लावण्यात आली होती. मात्र, हे मंदिर उभारल्यापासून टीकाही झाली होती.