जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचे नांव..!

0
105

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातमधील अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. सर्वाधिक प्रेक्षकांना सामावून घेणारे ‘मोटेरा स्टेडियम’ आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ या नावाने ओळखले जाणार आहे. या स्टेडियमचे नामांतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज (बुधवार) करण्यात आले. याप्रसंगी गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरण रिजीजू, बीसीसीआयचे सचिव जय शहा आदी उपस्थित होते.

मोटेरा स्टेडियम सरदार पटेल स्पोर्टस इन्क्लेव्हचा भाग आहे. या स्टेडियममध्ये ४ ड्रेसिंग रूम तर मैदानात ११ खेळपट्या आहेत. आधुनिक एलईडी लाईट्स येथे  बसवल्या आहेत. राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना जय शहा यांच्या मार्गदर्शनाखाली  स्टेडियमची पुनर्बांधणी केली आहे. या स्टेडियमवर १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात.

दरम्यान, मोदी यांचे नाव स्टेडियमला दिल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. हा सरदार पटेल यांचा अपमान आहे. सरदार पटेल यांच्या नावावर मत मागणारी भाजप आता लोहपुरूष सरदार पटेल यांचा अपमान करत आहे, असे काँग्रेसचे नेते सज्जनसिंग वर्मा यांनी म्हटले आहे.