कमलनाथांचे सरकार पाडण्यामध्ये पंतप्रधान मोदींची महत्त्वाची भूमिका

भाजप नेत्याचा गौप्यस्फोट     

0
196

भोपाळ (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामा दिल्याने  तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येऊन कोसळले होते. या नाट्यमय राजकीय घडामोडीबाबत भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी गौप्यस्फोट केला आहे. कमलनाथ यांचे सरकार पाडण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच भूमिका महत्त्वाची होती, असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.  

इंदौरमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी संमेलनात कैलास विजयवर्गीय बोलत होते. ते म्हणाले की, जोपर्यंत कमलनाथ यांचे सरकार होते, तोपर्यंत सुखानं झोपू दिले नाही. भाजपचा कुठला कार्यकर्ता असेल, जो कमलनाथ यांना स्वप्नातही दिसत असेल, तर ते नरोत्तम मिश्रा होते. टाळ्या वाजवून मिश्रा यांचे स्वागत करायला हवे. मी इथे पडद्यामागील गोष्ट सांगत आहे, याची वाच्यता कुठे करू नका. मी सुद्धा आजपर्यंत कुणालाही सांगितलेली नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगतोय. कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात जर कुणाची महत्त्वाची भूमिका होती, तर ती नरेंद्र मोदी यांची होती. धर्मेंद्र प्रधान यांची नव्हती. पण, कुणाला ही गोष्ट सांगू नका, असा गौप्यस्फोट  विजयवर्गीय यांनी केला.