नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात महिला हॉकी संघाला अपयश आलं. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदक पटकावले. यामुळे महिला खेळाडूंमध्येही निराशेचे वातावरण आहे. मात्र चाहत्यांनी संघाला धीर देत २०२४ साली होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनीही संघाशी संवाद साधला. रडू नका, तुमच्या कामगिरीवर देशाला गर्व आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले.

 ब्रिटनच्या संघाने भारतीय संघाला ४-३ ने पराभूत केले. पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये तब्बल पाच गोल झाले. ब्रिटनने १-० ची आघाडी बराच काळ टिकवली होती. त्यानंतर केवळ दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.

भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनीही ट्विटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही पदक जिंकलो नसलो तरी भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याचा आनंद आहे, असं त्यांनी म्हटले. तर पंतप्रधान मोदी यांनी संघाशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मिनिटं ४८ सेकंद त्यांच्याशी वार्तालाप केला.

तुम्ही सर्व खूप छान खेळलात. तुम्ही इतका घाम गाळलात. पाच वर्षापासून सर्व सोडून तुम्ही हीच साधना करत होतात. तुमची मेहनत पदक आणू शकलं नाही. मात्र तुमच्या घामाचा प्रत्येक थेंब कोट्यवधी भारतीय महिलांसाठी प्रेरणा आहे. मी संघाच्या सर्व सहकाऱ्यांना आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा देत आहे. तुम्ही रडणं बंद करा. देश तुमच्यावर गर्व करत आहे. निराश होऊ नका. किती दशकांनंतर हॉकी, भारताची ओळख, पुन्हा पुनर्जीवित होत आहे. हे तुमच्या मेहनतीमुळे झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आणि प्रोत्साहनही दिले.