कळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला होता. हा उपक्रम राबविणाऱ्या ३१ गावांचा तसेच कोरोना योद्धा आणि पोलीस मित्रांचा कळे पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा सन्मान सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्याहस्ते प्रमाणपत्र देवून करण्यात आला.

पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पूर्वीपासून १९ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविला जात होता. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या अगोदर महिनाभर कळे पोलिसांनी गावोगावी बैठक घेऊन हा उपक्रम  राबविण्याबाबत आवाहन केले होते. याला आणखी १२ गावांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन एकूण ३१ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविला. तसेच कोविड योद्धा आणि पोलीस मित्रांचाही प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

गौरव करण्यात आलेल्या गावांमध्ये आंबर्डे, साळवाडी, तांदूळवाडी, जाधववाडी, माजनाळ, गोठणे, चाफेवाडी, काळजवडे, सुळे, आसगाव, बांद्रेवाडी तसेच निवाचीवाडी, गागवे, पणोरे, पिसात्री, वाळवेकरवाडी, वाळोली,गोठे, काऊरवाडी, वाशी, मोरेवाडी, म्हाळुंगे, तळेवाडी, पानारवाडी, कुंभारवाडी त्याचबरोबर काटेभोगाव, किसरुळ, मल्हारपेठ, मुगडेवाडी, बळपवाडी आणि  नवलेवाडी या गावांचा समावेश आहे.

कार्यक्रमामध्ये उमेद फाऊंडेशनच्यावतीने गेले ६ महिने बंदोबस्तासाठी रस्त्यावर असणाऱ्या कळे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी काटेभोगावचे सरपंच रवींद्र पाटील,  मल्हारपेठचे सरपंच सीताराम सातपुते, पोलीस पाटील संभाजी पाटील (काटेभोगाव), सुरेखा पाटील (वाघुर्डे), निवृत्ती पाटील (म्हाळुंगे) , पोलीस हवालदार अशोक निकम यांच्यासह विविध गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पोलीस पाटील रामदास पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.