कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन एकरकमी २९०० रुपये देण्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी जाहीर केले आहे.

शासन आदेशाप्रमाणे कारखान्याची निव्वळ देय एफआरपी ही या वर्षीच्या गळीत हंगामातील साखर उताऱ्यावर व प्रत्यक्ष होणाऱ्या ऊस तोडणी वाहतूक खर्चावर आधारित असणार आहे. तथापि सध्या मागील हंगामातील साखर उतारा, ऊस तोडणी वाहतूक खर्च विचारात घेऊन हा ऊस दर जाहीर केला आहे, असे महाडिक यांनी म्हटले आहे.

ते म्हणतात की, राजाराम कारखान्यचे कार्यक्षेत्र ७ तालुक्यात १२२ गावांत विखुरलेले असून, जवळपास ७० ते ७५ कि.मी. वरून वाहतूक करून ऊस आणावा लागतो. कार्यक्षेत्रातील बरीच गावे नदी काठावर वसली असल्याने बऱ्याच वेळा ऊस क्षेत्र पूरबाधित होते. सभासद शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अशा पूरबाधित नोंद क्षेत्रातील संपूर्ण ऊस कारखाना गळितास आणतो.

कारखाना शहरी वस्तीमध्ये असल्याने सहविज निर्मिती प्रकल्प व विस्तारीकरणास जागेची अडचण भासते आणि पंचगंगा नदी काठापासून कारखाना अत्यंत जवळ असल्याने इथेनॉल सारखा नवीन प्रकल्प उभारणीस तांत्रिक अडचणी उद्भवतात. आपल्या कारखान्याचा कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त उत्पन्न नसताना देखील निव्वळ साखरेच्या उत्पन्नावर आधारीत अन्य कारखान्यांच्या बरोबरीने आपल्या कारखान्याने हा ऊस दर जाहीर केला आहे, असे महाडिक यांनी म्हटले आहे.

आम्ही सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य दर जाहीर करतो किंवा जाहीर वाच्यता न करता देखील इतर कारखान्याच्या बरोबरीने बिल आदा करतो, याचा ठाम विश्वास आमच्यावर सभासद शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे. तो तसाच ठेवावा आणि आपला सर्व ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा, असे आवाहन महाडिक यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, संचालक अमल महाडिक व इतर संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस व अधिकारी उपस्थित होते.