कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लम्पी चर्मरोगाची लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी घाबरुन न जाता तत्काळ नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचारासह रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण व औषधोपचार मोफत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्याकडे लम्पी आजाराने बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी लागणारा आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. लम्पीने जनावर मृत झाल्यास अशा जनावरांची विल्हेवाट योग्य त्या शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करुन लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील. याकरिता मृतदेहाची विल्हेवाट लावताना जमिनीमध्ये ८ फूट खड्डा काढून मृतदेह दफन करताना टीसीएल पावडर, चुना यांचा वापर करावा. याकरिता प्रति जनावर १५०० रुपये इतके अनुदान देय आहे. जर एखाद्या पशुपालकांनी मृतदेहाची विल्हेवाट उक्त पध्दतीने केलली असेल, तर त्याच्या कागदपत्राची पडताळणी करुन १५०० रुपयांची प्रतिपूर्ती संबंधित पशुपालकास देय राहील.

ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्यांकडील बैलांना तसेच त्यांच्याकडील इतर गोवर्गीय पशुधनास लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. जनावरांना लसीकरण झाल्यानंतर १४ ते २१ दिवसानंतर लसीकरण केल्याबाबतचा दाखला सादर केल्यानंतर जिल्ह्यामध्ये जनावरांस प्रवेश देण्यात येईल. जनावरांना उपचार करताना अथवा लसीकरण करताना पशुवैद्यक नवीन सुईचा वापर करीत आहेत की नाही याची शहनिशा पशुपालकांनी करावी. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, संबंधित पशुवैद्यक यांची समिती गठित करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांमधन लम्पी रोगाच्या लसीकरणासाठी सेवा पुरवलेल्या खासगी पशुवैद्यकीय सेवादात्यास ३ रुपयांऐवजी ५ रुपयांप्रमाणे प्रति जनावर असे मानधन आदा करण्यात येणार आहे, असे राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.