कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळून ५० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यास परवानगी आहे. पण यासंबंधीचा परवाना देण्याची जबाबदारी कोणाची याबद्दल संभ्रम आहे. जिल्हा प्रशासन महापालिकेकडे तर महापालिका जिल्हा प्रशासन, पोलिसांकडे बोट दाखवत आहे. यामुळे परवाना कोण देणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाम बासरानी यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध विभाग पूर्ववत होत आहे. छोटे, मोठे कार्यक्रमही होत आहेत. केंद्र सरकारने ५०० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकार ५० जणांची मर्यादा घातली आहे. पण या मर्यादेत राहूनही कार्यक्रम करण्यासाठी नेमके कोणाकडून परवानगी घ्यावी, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. परवानगी कोणाकडे मिळते हे प्रशासनाने त्वरित स्पष्ट करावे, असे केल्यास असोसिएशनतर्फे एक खिडकी आणि हेल्पलाईन सुरू केली जाईल. या वेळी असोसिएशनचे सचिव पावन बेकीनकर, खजिनदार ज्योती जाधव आदी उपस्थित होते.