कोल्हापूर (प्रतिनिधी) : कलाकारांनी स्वत:ला एकटे समजू नये. चित्रपट महामंडळ आणि शासन आपल्या पाठीशी आहे. यापुढेही कलाकारांना मदत केली जाईल, असं आश्वासन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिलं. ते आज (सोमवार) कोल्हापुरात कलाकारांना जीवनावश्यक वस्तू वाटपप्रसंगी बोलत होते.

कोरोनामुळं चित्रपट व्यवसाय बंद आहे. या व्यवसायावर अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ अवलंबून आहेत. मागील दीड वर्षांपासून कामापासून वंचित असलेल्या कलाकारांना नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन आणि मदत वेलफेअर ट्रस्ट, पुणे यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे विश्वस्त उमेश कोठेकर, दिपाली वारुळे, अनुश्री काळे, Tell A Tale Media Pvt. Ltd. निर्मित आणि ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील कलाकार सौरभ चौगले, योगिता चव्हाण, प्रतीक्षा मुणगेकर, दिग्दर्शक अजय कुरणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ३०० कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आलं.

या वेळी मेघराज राजेभोसले यांनी कलाकारांना धीर दिला. शासनानं राज्यातील ५६ हजार कलाकारांना ५ हजार रुपयांची मदत केली असून, तुम्हा कलाकारांनाही ही मदत मिळणार असल्याचं सांगितलं. उमेश कोठेकर यांनीही यापुढे कलाकारांना मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला अभिनेत्री पूजा पवार यांच्यासह महामंडळाचे जिल्ह्यातील सभासद, संचालक शरद चव्हाण, रवींद्र गावडे, अरुण नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर, रोहन स्वामी आदी उपस्थित होते.