कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा येथील देवघरात जरीपटक्याचे विधीवत पूजन करून संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते हा जरीपटका ध्वज सुपूर्द करण्यात आला.

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस दिल्लीचा बादशहा औरंगजेब स्वराज्यावर चाल करुन दक्षिणेत आला, तेव्हा त्याने आषाढी वारीला उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांनी या पालखी सोहळ्याला संरक्षण देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब यांनीदेखील पालखी सोहळ्याला संरक्षण आणि सहकार्याची परंपरा कायम ठेवली. छत्रपती घराण्याकडून पालखी सोहळ्याकरिता मानाचा जरीपटका ध्वज अर्पण करण्यात येत असे व हा ध्वज पालखीच्या अग्रस्थानी असे.

स्वराज्याचा हा ध्वज आजही पालखीच्या अग्रभागी डौलाने फडकत असतो. शेकडो वर्षाची परंपरा वारकरी संप्रदाय आजही निष्ठेने जपत आहे. मधल्या काळात काही कारणास्तव लुप्त झालेली ही परंपरा मागील वर्षीपासून पुन्हा सुरु करण्यात आली. मागील वर्षी तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान पूजेस उपस्थित राहून जरीपटका ध्वज महाराजांच्या पालखीस अर्पण केला होता.