स्वेरीच्या एमबीए विभागात ‘उद्योजकता विकास’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी –
‘कार्यात एकाग्रता, विचारांमध्ये सकारात्मकता, दूरदर्शी दृष्टिकोन, उत्तम नेतृत्व, विश्वासपूर्वक निर्णय क्षमता, पारदर्शक व्यवहार, नम्रता, मधुर संभाषण कौशल्य, वस्तूंचे महत्व पटवून देण्याची उत्तम कला, सहिष्णुता, ध्येयवाद, सकारात्मकता, गुणवत्ता प्रधान व मैत्रीपूर्ण संभाषण हे आवश्यक आणि महत्वाचे गुण ज्यांच्याकडे आहेत तेच उद्योग क्षेत्रात यशस्वी ठरतात. या स्पर्धेच्या युगात आपल्या वस्तूंचे उत्तम सादरीकरण करता आले पाहिजे. यामुळे एमबीए उत्तीर्ण झाल्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात उज्वल यश मिळू शकते.’ असे प्रतिपादन डॉ.अण्णासाहेब गुरव यांनी केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता.पंढरपूर) स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एमबीए व एमसीए या विभागांतील विद्यार्थ्यांसाठी ‘उद्योजकता विकास’ या विषयावर आधारित मार्गदर्शन सत्रामध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे डॉ.अण्णासाहेब गुरव हे प्रमुख मार्गदर्शन करत होते. ‘एमबीए’चे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी ‘उद्योजकता विकासा’ चे महत्व सांगून व्यावसायिक क्षेत्रातील त्याचे असलेले महत्व विशद केले. एमसीए अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख यांनी प्रास्ताविकामध्ये ‘एमबीए’ व ‘एमसीए’ विभागाकरता ‘इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट’ कार्यक्रमाची का आवश्यकता आहे? हे स्पष्ट केले.
पुढे बोलताना डॉ.अण्णासाहेब गुरव म्हणाले की, ‘उद्योग क्षेत्रात प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक क्षण हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आज मार्केटिंग क्षेत्रामध्ये केवळ गुणवत्ता प्रधान व्यक्तींनाच यश मिळत असते. यासाठी आपण सतत तत्पर असावे लागते. जागतिक बाजारपेठेत आपल्या वस्तूंचे मार्केटिंग करताना अद्ययावत माहिती, गुणवत्ता, आदी बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रामध्ये कोणताही व्यवसाय असो तो यशस्वी होतो परंतु त्यासाठी संयम, प्रामाणिक प्रयत्न ही बाब खूप महत्वाची असते. मार्केटिंग करताना जागतिक बाजारपेठेत आपल्या वस्तूंचे मोल हे खूप महत्वाचे आहे हे पटवून सांगताना उत्तम सादरीकरण करावे लागते. समोरचा ग्राहक हा विक्रेत्यांच्या प्रत्येक मतांवर बारकाईने विचार करत असतो. खरेदी करणारा ग्राहक वस्तूची गुणवत्ता जाणून घेतल्यानंतर वस्तु खरेदी करतो. यासाठी उद्योग व्यवसायात आपले संभाषण कौशल्य ही महत्वाची भूमिका बजावते’ असे त्यांनी सांगीतले. डॉ.गुरव यांनी एमबीए मध्ये ‘लॅटरल थिंकिंग’ला खूप महत्व असल्याचे स्पष्ट करून मार्केटिंग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कानमंत्रही दिले.आपल्या मार्गदर्शनातील हजरजबाबी भाषेमधून त्यांनी अनेकांना बोलते केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील उद्योगधंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी नेमके काय काय करावे लागते याची माहिती जाणून घेतली. एमबीए व एमसीए मधील विद्यार्थ्यांनी मार्केटिंग करताना उदभवणारे प्रश्न विचारले असता डॉ. गुरव यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमात डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर व एमबीए व एमसीए मधील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मिनल भोरे यांनी केले तर प्रा.अमाद अहमद यांनी आभार मानले.