कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल येत्या दोन दिवसात सादर करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या जिल्ह्यातील गट विकास अधिकाऱ्यांची बैठकीत चव्हाण बोलत होते.

पंचगंगेच्या प्रदूषणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी प्रदूषणाला नदीकाठीची गावे कारणीभूत असून, प्रामुख्याने ३९ गावांतून सांडपाणी बाहेर पडून पंचगंगा नदी प्रदूषण होत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार १६८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल यांनी केलेल्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

प्रामुख्याने नदीकाठच्या ३९ गावांमुळे पंचगंगेचे प्रदूषण होत असल्याचे सर्वेक्षण करण्यात आले असले तरी इतर गावातील सांडपाणी संदर्भात प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना चव्हाण यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या गावातून सांडपाणी बाहेर पडून पंचगंगा नदी प्रदूषित होते त्या सर्व गावांची तातडीने पाहणी करा. याबाबतचा वस्तुस्थितीचा अहवाल येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.