भोगवटादार अनिल परमाळे यांना घरफाळा विभागाची जप्तीपूर्व नोटीस  

0
86

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरीत बालक बालकल्याण संस्था इमारतीमधील भोगवटदार अनिल परमाळे यांना महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून २१ लाख ४ हजार ७१९ रुपयांच्या कर आकारणी व दंडाच्या वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत त्यांना ७ दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती कर अधीक्षक तानाजी मोरे यांनी दिली.

महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं. २ घरफाळा विभाग मधील सि.स.नं. १५१७ सी वॉर्डमधील मिळकतमालक कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरीत बालक बालकल्याण संस्था इमरतीमधील भोगवटदार अनिल परमाळे यांना २५ नोव्हेंबर २०२० रोजी मिळकतीमधील थकबाकी संदर्भात महाराष्ट महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण ८ कर विषयक नियम ४२ मधील असलेल्या तरतुदीनुसार जप्ती पूर्व नोटीस बजावण्यात आली आहे.

या मिळकतीमधील आजअखेर थकबाकी रक्कमेपोटी मिळकतीमधील वापरामध्ये येणाऱ्या क्षेत्रासाठी कर आकारणीमधील मुद्दल १३ लाख ४ हजार ४६४ व त्यावरील होणारा दंड ८ लाख ३ हजार ५१६ असा एकूण २१ लाख ४ हजार ७१९ रुपयांच्या वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली असून या भोगवटदारास ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मिळकतीमधील भोगवटदारांनी मिळकतीचा कर न भरल्यास त्या मिळकतीस सीलबंदची कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही तानाजी मोरे यांनी दिला आहे.