आ. प्रकाश आवाडेंकडून ‘आयजीएम’ रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती

0
106

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आयजीएम रुग्णालयातील अपुरे कर्मचारी,   अस्वच्छता, कचऱ्याचा ढीग, रूग्णांच्या समस्या याबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आ. प्रकाश आवाडे यांनी आज (बुधवार) रूग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी सर्व विभागांना भेट त्यांनी देऊन येथील गंभीर परिस्थितीबद्दल संताप व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरले. येत्या दोन दिवसांत पुरेसे स्वच्छता कर्मचारी न नेमल्यास माझ्या पद्धतीने कार्यवाही करु, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी भरला.

यावेळी आ. आवाडे यांनी अतिदक्षता विभागात जाऊन प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधून त्यांना उपचारादरम्यान येत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भात आयजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत शेटये यांच्याशी चर्चा केली. यावेळी डॉ. शेट्ये यांनी अपुरा स्वच्छता कर्मचारी वर्ग असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे मान्य केले. कर्मचारी पुन्हा बोलावून घेतल्याचे सांगितले. यावर आवाडे यांनी तत्काळ पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल दत्त संगेवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माळी यांच्याशी देखील मोबाईलवरुन संपर्क साधून आयजीएम रुग्णालयातील गंभीर परिस्थितीची माहिती देऊन याठिकाणी तातडीने पुरेसे स्वच्छता कर्मचारी नेमण्याच्या   सूचना दिल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते कपिल शेटके, राहुल घाट आदीसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.