जिल्हा बँकेसाठी प्रदीप पाटील-भुयेकर यांचे दोन गटात उमेदवारी अर्ज दाखल…

0
152

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रदीप पाटील-भुयेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दोन गटातून दाखल केला. राष्ट्रवादीचे असलेले प्रदीप पाटील यांनी मार्केटिंग -फेडरेशन गटातून आणि नागरिकांचा इतर मागास प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आणि हसन मुश्रीफ यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले प्रदीप पाटील यांनी जिल्हा पातळीवरील सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक निवडणुकीमध्ये डमी म्हणून उमेदवारी दाखल करून पक्षाच्या आदेशानुसार माघारी घेतली आहे.

जिल्हा बँकेत मार्केटिंग-फेडरेशन प्रवर्गातून सध्याशिवसेनेचे खा. संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-असुर्लेकर हे प्रतिनिधित्व करीत आहेत. बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांचा प्रखर विरोध आहे. आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे ना. हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री ना. सतेज पाटील यांची जनसुराज्य पक्षाचे आ. विनय कोरे यांना नाराज करून कोणताही निर्णय घ्यायचा नाही अशी सध्याची परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर बाबासाहेब पाटील यांना डावलून त्या ठिकाणी दुसऱ्या कोणालाही उमेदवारी देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी सक्षम पर्याय म्हणून प्रदीप पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. याबरोबरच विनय कोरे यांच्यासह हसन मुश्रीफ आणि आ. सतेज पाटील यांचीही प्रदीप पाटील यांच्यासाठी सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे यावेळी प्रदीप पाटील यांना नागरीकांचा इतर मागास किंवा मार्केटिंग-फेडरेशन प्रवर्गात संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांनी या दोन्ही गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी शिरोलीचे माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण यांच्यासह सूचक, अनुमोदक उपस्थित होते.