कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेअंतर्गत मंजूर प्रकरणे असलेल्या लाभार्थ्यांनी अद्याप बांधकाम परवानगी घेतलेली नाही. अशा लाभार्थ्यांकरिता महापालिकेच्या वतीने दोन दिवसाच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प दि. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी घेऊन, त्वरित बांधकाम सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी बांधकाम परवानगी त्वरित मिळून बांधकाम करण्यास सुलभ व्हावे, यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे, त्या घरासाठी भोगवटा (बांधकाम पूर्णत्वाचा दाखला) देण्यात येणार आहे.
याकरिता महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व सहायक संचालक नगररचना विभागामार्फत दि. ९ व १० फेब्रुवारी रोजी हा कॅम्प होत आहे. या शिबिरामध्ये मिळकत पत्रक (३ महिन्यातील ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्ड)/मोजणी नकाशा (सिटि सर्वे), ले-आऊट ऑर्डर/नकाशा, झोन दाखला व भाग नकाशा इत्यादी कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.
हा कॅम्प राजारामपुरी, जनता बझार, सहायक संचालक नगररचना कार्यालय येथे घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकरणांच्या लाभार्थ्यांनी या कॅम्पमध्ये वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.