राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठे आणि तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राशिवडे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडीसाठी तिरंगी लढती होतील, असा रागरंग आहे. शिवाय सरपंचपदासाठी तीन महिला उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने यातही तिरंगी लढत चुरशीची पाहावयास मिळणार आहे.

सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी ग्रा.पं. निवडणुकीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी झालेली दिसून येत आहे. यंदा पुन्हा भोगावती कारखान्याचे माजी संचालक अविनाश पाटील, जि.प.चे माजी सदस्य विनय पाटील आणि सतेज पाटील समर्थक मोहन धुंदरे यांच्या नेतृत्वाखालील शिवशाहू ग्रामविकास आघाडी आणि गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे भोगावती साखर कारखान्याचे विद्यमान संचालक कृष्णराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास आघाडीमध्ये लढत होत आहे. बचाव कृती समितीच्या माध्यमातून भाजपप्रणित राशिवडे बचाव आघाडी सहभागी होणार असल्याने तिरंगी लढतीचे सध्या तरी चित्र दिसत आहे. काही अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत.

तसे पाहिले तर ग्रा.पं. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवसापासून सरपंचपदाचे उमेदवार प्रचारात सक्रिय झाले आहेत. गावातील घरोघारी भेट देऊन त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. इच्छुकांची तोबा गर्दी असल्यामुळे व विरोधी पॅनेलचा उमेदवार पाहूनच तगडा उमेदवार देण्याच्या प्रयत्नाने माघारीच्या दिवशीच सदस्यपदासाठी उमेदवार यादीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत भरणार आहे.

शिवशाहू ग्रामविकास आघाडीकडून सरपंचपदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अमृता पाटील या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी या अगोदर सरपंचपद भूषविले आहे. तो अनुभव आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दिवंगत बापूसो सावळा पाटील या माजी सरपंचांच्या सूनबाई संजीवनी पाटील या राजकीय वारसाच्या बळावर ग्रामविकास आघाडीकडून रिंगणात उतरल्या आहेत. राशिवडे बचाव कृती समितीने सरिता शिंदे या सर्वसामान्य महिलेस संधी दिली आहे.

शिवाय भोगावती साखर कारखान्याच्या माजी संचालिका सुनीता डकरे या अपक्ष म्हणून लढत देत आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत होत असली तरी देखील अंतिम दिवशी कोण माघार घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी असणारी राशिवडे ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात असावी, याकरिता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे; पण जनसामान्यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे मात्र अजून तरी गुलदस्त्यातच आहे.