गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक आठवड्याला बदलणार..?

0
130

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक आठवड्याला निश्चित करण्याची मुभा द्यावी, असा प्रस्ताव सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला दिला आहे. मंत्रालयाने या प्रस्तावाला परवानगी दिली तर पुढील वर्षाच्या १ एप्रिलपासून गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक आठवड्याला निर्धारित केले जाऊ शकतात.

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतारानुसार तेल कंपन्या दररोज पेट्रोल, डिझेलचे दर निर्धारित करीत असतात. त्याच धर्तीवर आता गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक आठवड्याला ठरवले जाऊ शकतात. सध्या सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला निश्चित केले जातात. जर प्रत्येक आठवड्याला निश्चित करण्यात आले तर त्याचा फायदा ग्राहक आणि कंपन्यांना होऊ शकतो, असा तेल कंपन्यांचा दावा आहे. तेल कंपन्यांनी चालू महिन्यात दोनवेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.