दुकानाची वेळ नऊ वाजेपर्यंत वाढविण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) :येणाऱ्या सणासुदीच्या काळातील संभाव्य गर्दी विचारात घेऊन कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवता यावा, यासाठी दुकानांच्या वेळा सात ऐवजी नऊ वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देऊन करण्यात आली.

असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करताना राजारामपुरी सह कोल्हापूर शहरातील सर्व व्यापारी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना नियमितपणे करत असून योग्य ती खबरदारी घेत आहेत.सणासुदीच्या काळामध्ये विशेषता दसरा-दिवाळी या महत्त्वपूर्ण सणामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होणार आहे सात वाजेपर्यंत मर्यादित वेळ ठेवल्यास एकाच वेळी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे म्हणून दुकानांच्या वेळा किमान नऊ वाजेपर्यंत वाढवण्याची गरज आहे असे सांगितले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच यासंबंधीचे आदेश निर्गमित केले जातील असे आश्वासन दिले.तसेच व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स या तीनही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे याचे आग्रही प्रतिपादन केले.

तसेच स्वतः जिल्हाधिकारी  विविध ठिकाणी आकस्मिक भेट देणार असून, व्यापारी व ग्राहक यांच्याकडून या निकषांचे पालन केले जाते की नाही याची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी असोसिएशनचे संचालक हर्षवर्धन भुरके,  प्रताप पवार तसेच अन्य व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here