कोतोली (प्रतिनिधी) : तिरपण (ता. पन्हाळा) येथील गणेश मंदिर चौक ते कोलोली येथील खिंडीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून ते वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. या खड्डयामुळे एखादा अपघात होण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी वाहन धारकांतून मागणी होत आहे.

तिरपण ते कोलोली हा तीन किलोमीटरचा रस्ता दहा वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाला होता. त्यानंतर आजतागायत या रस्त्याची डागडुजी झालेली नाही. कोलोली येथील लिंडोरी नावाच्या भागात नदीच्या पुराचे पाणी येऊन दलदलीचा व जास्त खराब झालेला रस्ता काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या फंडातून करण्यात आला आहे. पण अशा पध्दतीने ठराविक ठिकाणचा रस्ता न करता तिरपण ते कोलोली या तीन किलोमीटरचा पूर्ण रस्ता नवीन करण्याची गरज असून तशी मागणी होत आहे.