२८१ केंद्रावर होणार मतदान : जिल्हाधिकारी

0
122

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १ डिसेंबरला जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ३० नोव्हेंबरला आपआपल्या मतदान केंद्रावर कर्मचारी जातील. त्या दिवशी पुन्हा त्यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान निर्भय आणि मुक्तपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेसाठी पोलीस तैनात असतील. मतदान केंद्राच्या बाहेरही पोलीस यंत्रणा आणि गृहरक्षक दल यांची नियुक्ती केली जाईल. कोणताही गैरप्रकार होणार नाही, याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व मतदान केंद्रात पाणी, स्वच्छतागृहे, मदत कक्ष, आवश्यक फर्निचर यांची सुविधा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना अनुषंगाने सामाजिक अंतर, सॅनेटायझरचा वापर, थर्मल गनचा वापराबाबत खबरदारी घ्यावी. पल्स ऑक्सीमीटरची सुविधाही ठेवावी. मतदान केंद्रांचे निर्जंतुकिकरण करुन घ्यावे. आवश्यक मनुष्यबळांची नेमणूक झाल्याची खात्री करावी. दक्ष राहून मतदान केंद्रांची काटेकोर तपासणी करावी, असे सांगितले.