कोल्हापूरसह ५ महापालिका, ९६ नगरपालिकांसाठी फेब्रुवारीत मतदान..?

0
332

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, ग्रामपंचायती, नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून त्यावरही लसही लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रलंबित निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार असल्याची दाट शक्यता आहे. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेचा समावेश आहे. तर मुदत संपलेल्या आणि लवकरच मुदत संपणाऱ्या ९६ नगरपालिकांचाही समावेश आहे.

महाविकासआघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महापालिका निवडणुकांबाबतही उत्सुकता आहे. काही महिन्यांपूर्वीच बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निकालही लागला. त्यामुळे आता राज्यातील निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं काम सुरू आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकतीच ८१ प्रभागांसाठी आरक्षण सोडत पार पडली आहे. आता इच्छुक उमेदवार कामाला लागले असून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. एकंदरीत फेब्रुवारी महिना राजकीय रणधुमाळीचा ठरणार हे मात्र नक्की…