कोल्हापूर (उत्तम पाटील) : चंदगड तालुक्यातील नेते, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी भाजप सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गोकुळ संघ, राजाराम कारखाना आणि केडीसीसीची निवडणूक काही महिन्यांतच होणार असल्यामुळे आतापासूनच राजकीय साठमारीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रत्येक तालुक्यातील अनेक नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे दिसून येते. याची सुरुवात म्हणजे चंदगडच्या गोपाळराव पाटील यांची काँग्रेसमध्ये जाण्याची मानसिकता…

चंदगडचे राजकारण हे भरमूअण्णा, आ. राजेश पाटील आणि गोपाळराव पाटील यांच्या सभोवतालीच फिरते. यामध्ये माजी आमदार कै. व्ही. के. चव्हाण-पाटील आणि कै. नरसिंगराव पाटील हे दोन्ही जवळचे नातेवाईक. तसेच गोपाळराव हे कै. नरसिंगराव यांचे मेहुणे. माजी रोहयोमंत्री भरमूअण्णा हे कै. चव्हाण-पाटील यांचे शिष्य. तर आ. राजेश पाटील हे माजी आमदार कै. नरसिंगराव यांचे पुत्र. एकंदरीत चंदगडमधील राजकीय लढाई ही नातेवाइकांमध्येच चालू असते.

गोपाळराव पाटील यांची नाराजी

गोपाळरावांनी भाजपमध्ये प्रवेश केला खरा, पण विधानसभेला त्यांना तिकीट मिळाले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचे अगदी जवळचे असलेले शिवाजी पाटील यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले.  पक्षप्रवेशावेळी चंद्रकांतदादांनी आश्वासन दिले खरे पण ते सत्यात उतरले नाही. त्यामुळे सुरुवातच नाराजीने झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्याच मताने पराजित झालेले गोपाळराव यावेळी कदाचित निवडूनही आले असते. तेव्हापासून कार्यकर्ते नाराज होते. निवडून आल्यावर आमदार राजेश पाटील यांचा म्हणावा तसा गावोगावी संपर्क दिसून येत नाही. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांना म्हणावे तसे पाठबळ दिले नाही. राष्ट्रवादी गावोगावी दोन-तीन गटात विखुरलेली दिसून येते. आमदार पाटील यामधील एकाच गटाला ताकद देत असल्यामुळे बाकीचे विखुरलेले गट नवीन नेत्याच्या शोधात आहेत.

राजकीय साठमारी

सध्या कोल्हापुरात गोकुळ, राजाराम कारखाना आणि केडीसीसीच्या निवडणुकीची समीकरणे बांधली जात आहेत. गेल्या वेळी हुकलेली सत्ता पालकमंत्री सतेज पाटील यांनी या वेळी मिळवायचा ध्यास घेतला आहे. याचाच एक भाग म्हणजे चंदगड तालुक्यात भाजपला लागलेला सुरुंग. सतेज पाटील यांचा प्रत्येक तालुक्यात एक गट ‘सतेज टीम’ म्हणून काम करतो. माजी खासदार धनंजय महाडिक यांचा ‘युवाशक्ती गट’ प्रत्येक तालुक्यात आहे. पण, अलीकडे त्या गटाला मरगळ आल्याचे दिसून येते. पाठबळ मिळत नसल्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी कमजोर पडत असल्याचे दिसून येते.

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादांचे म्हणावे तसे ग्रामीणमध्ये जाळे नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी सहकारामुळे जसा तळागाळात रुजलाय तसा भाजप पक्ष तळागाळात रुजला नाही. भाजपला फक्त वातावरणनिर्मिती करता आली. पण, लोकांच्या अंतर्मनात विश्वास निर्माण करता आला नाही. जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आयात केलेल्या नव्या कार्यकर्त्याना पक्ष मानवला नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा फोन उचलत नाहीत अथवा परत फोन करत नाहीत, असा नाराजीचा सूर काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका मेळाव्यात उमटला होता.

गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आणि जिल्ह्यातील ‘टीम सतेज’च्या प्रमुख शिलेदारांनी चंदगड येथे गोपाळराव यांची ताबडतोब भेटही घेतली. राजकीय धुळवडीला तर सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा मध्यबिंदू असलेल्या या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कोणाच्या सत्तेत उलथापालथ होणार, हे पुढच्या काळातच दिसून येणार आहे.