कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे सर्वच प्रमुख पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षातर्फे शहरातील सर्व प्रभागात उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा असणारे आणि नवे इच्छुक असलेले प्रभागातील तरुण मंडळांशी संपर्क वाढवला आहे.

महापालिकेवर सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. दरम्यान, कोरोनामुळे निवडणूक निर्धारित वेळेत होणार नाही. लांबणीवर पडणार आहे. तरीही इच्छुक आतापासून तयारी करीत आहेत. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच भाजपने प्रत्येक प्रभागात कोरोना काळात मोफत वैद्यकीय उपचारासाठी एका डॉक्टरची नियुक्ती केली. काँग्रेस, राष्ट्रवादीने शहरातील विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका लावला आहे. प्रलंबित विकासकामेही मार्गी लावण्यासाठी धडपड केली जात आहे. यामुळे निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. पुन्हा रिंगणात येऊ इच्छिणारे विद्यमान प्रभागातील मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. प्रमुख पक्षीय पातळीवर प्रभागनिहाय तुल्यबळ उमेदवारांचा शोध केला जात आहे. यामध्ये नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते विशेष सक्रिय झाले आहेत.