मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्याचे लक्ष विधानपरिषदेच्या निवडणूक निकालाकडे असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय भूकंपाची तयारी सुरू झाली आहे. राज्यातील या संभाव्य राजकीय भूकंपाचे केंद्र गुजरातमधील सूरत असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ११ आमदार सध्या सूरतमध्ये असून, त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि ११ आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या हॉटेलबाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचा एक मोठा नेता यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीनंतर हा भाजप नेता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाला असल्याची माहिती आहे. ही बैठक गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.

शिवसेनेतील धुसफूस बाहेर 

विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १३ आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

विधानपरिषदेचे मतदान पार पडताच शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला सुरक्षित स्थळी पोहोचणार असल्याचे आधीच ठरले होते. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी यंदा राजकीय खेळी केली आहे. याला फडणवीस आणि अमित शहांचे पाठबळ मिळाले. सी. आर. पाटील यांनी याआधीही गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. यावेळीच हा कट शिजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदान झाल्यानंतर सुरतला रवाना व्हायचे, हे एकनाथ शिंदेंनी पूर्वनियोजित केले होते. मतदानानंतर आमदारांना रातोरात गुजरातला नेण्याच्या प्लॅनसाठी पाटील यांनी रसद पुरवली.

सी.आर. पाटील यांनी ही खेळी केल्याच्या वृत्ताला राऊतांनीच दुजोरा दिला. पाटील हे भाजपचे खासदार आणि प्रदेशअध्यक्ष आहेत. सी.आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांचेही निकटवर्तीय मानले जातात. राजकीय डावपेच आखण्यासाठी ते ओळखले जातात. रुपाणी यांची पकड कमी झाल्यानंतर मोदींच्या गटाने पाटील यांचं नाव पुढे केलं होतं. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये असंतोष असून, त्यांचा असंतोष बाहेर पडावा म्हणून पाचवा उमेदवार देत असल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी केले होते. त्यांच्या विधानाला निकालाने अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळाला आहे.