शिरोलीतही धावली ‘राजकीय समझोता एक्सप्रेस’…

0
306

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टोकाचा संघर्ष असलेल्या जिल्ह्यातील महाडिक-पाटील यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय समझोत्याने पालकमंत्री सतेज पाटील यांची  विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. असाच ‘राजकीय समझोता’ शिरोली पुलाची ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाचच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाडिक गट आणि सत्तारूढ आघाडी शाहू स्वाभिमानी आघाडी यांच्यात झाला. आणि दोन्ही गटासह  स्वतंत्रपणेही कोणीही  उमेदवारी अर्जच  दाखल केले नाहीत. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रिया स्थगित झाली. आता उर्वरित अवघ्या दहा महिन्यासाठी हे पद रिक्त राहणार असले तरी गावातील निवडणूक आणि त्यानिमित्ताने होणारा संघर्ष मात्र टळला. याबाबत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.

शिरोलीतील प्रभाग क्रमांक पाचमधून श्री शाहू स्वाभिमानी आघाडीच्या सुरेखा महेश चव्हाण निवडून आल्या होत्या. त्यांच्या जातीच्या दाखल्यावर महाडिक गटातील आरिफ सर्जेखान यांनी हरकत घेतली होती. यामुळे सुरेखा चव्हाण यांचे सदस्य सदस्य पद रद्द झाले. पण प्रक्रियेला  तब्बल चार वर्षांहून अधिक काळ गेला.  आता उर्वरित अवघ्या दहा महिन्यासाठी या जागेची निवडणूक जाहीर झाली. आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले.

या काळातच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याने आचारसंहितेचा मोठा काळ जाणार आहे. अवघ्या चार ते पाच महिन्यासाठी, शासकीय यंत्रणेचा वापर, लाखोंचा प्रचार, संघर्ष आणि तणाव हे सर्व टाळण्यासाठी ही जागा रिक्त ठेवून निवडणूक रद्द करण्याची संकल्पना महाडिक गटाचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे  यांनी दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांसमोर मांडली.

त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी सत्तारूढ आघाडीचे विद्यमान सरपंच शशिकांत खवरे, आघाडीप्रमुख अनिल खवरे, महेश चव्हाण उपसरपंच सुरेश यादव, विजय पोवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माजी आमदार अमल महाडिक यांनीही या संकल्पनेला दुजोरा दिला. आणि महाडिक  गटाकडून कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल होणार नाही याबाबतची ग्वाही दिली.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हातकणंगले येथील निवडणुक कार्यालयात दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल होणार नाही याची दक्षता घेतली. मुदतीनंतर सहाय्यक निवडणूक अधिकारी भोगण यांनी  उमेदवारीसाठी एकही अर्ज दाखल नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली असल्याची घोषणा केली. आणि समझोता एक्सप्रेस यानिमित्ताने यशस्वी झाल्याने  दोन्ही गटातील नेत्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, आघाडी प्रमुख अनिल खवरे, विजय पोवार, सरदार मुल्ला, ज्योतीराम पोर्लेकर, राजेंद्र सुतार, अशोक खोत, महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, सलीम महात, तसेच डॉ. सुभाष पाटील, संदीप तानवडे, सचिन गायकवाड, अनिल शिरोळे आदी उपस्थित होते.