कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात तक्रारदाराकडून दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी १० हजार लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने मंगळवारी अटक केलेल्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला आज (बुधवारी) न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय ३५, नेमणूक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, रा. मु. पो. शिंगणापूर, ता. करवीर) असे कोठडी सुनावलेल्या कॉन्स्टेबलचे नांव आहे.

कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातील एका व्यावसायिकांकडून दाखल गुन्हात मदत करण्यासाठी पोलीस काँन्स्टेबल दिग्विजय मर्दाने याने २५ हजारांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडीनंतर त्याने १० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने मर्दाने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी काल ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.