कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिरोली आणि गोकुळ शिरगांव पोलीसांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे एक लाख रुपये किंमतीच्या चार मोटरसायकलसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  सागर सात्ताप्पा शिंदे (वय ३८, रा. माळीगल्ली, कागल) आणि गुरू किसन पोवार (वय २८, रा. सांगाव,रोड काझी दवाखान्याजवळ कागल) अशी या चोरट्यांची नावे आहेत.

गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कणेरीवाडी पुलाजवळ विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना पोलीसांनी थांबवून  लायसन्स आणि  इतर कागदपत्रे, कामाचे कारण अशी चौकशी करीत होते. त्यावेळी दोन इसम विनानंबर प्लेटची स्पेंल्डर मोटरसायकल घेऊन आले. यांना पोलीसांनी थांबवून गाडीबद्दल चौकशी केली. त्यावेळी गाडीच्यामागे बसलेला इसम पळून जात होता. त्याला पकडून पोलीस अंमलदारांनी चौकशी केली असता ही गाडी नागांव फाटा येथून चोरी केल्याचे त्याने सांगितले.

त्या दोघांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  १ अश्या चार मोटरसायकली चोरल्याचे कबूल केले. यावेळी पोलीसांनी सुमारे  एक लाख रुपये किंमतीच्या चार मोटरसायकली जप्त केल्या.