मृत्युंजयकारांच्या स्मृती पोलीस प्रशासन जपेल : शैलेश बलकवडे

0
25

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठीतील लोकप्रिय मृत्युंजय कांदबरी लक्ष्मीपुरी पोलीस वसाहतीमध्ये लिहीली गेली, याचा आम्हांला अभिमान आहे. जरी ही वसाहत आता नव्या स्वरूपामध्ये उभारली जाणार असली तरीही या ठिकाणी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती पोलीस प्रशासन जपेल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

सावंत यांच्या स्मृतिदिनी आज (शनिवार) सकाळी येथील लक्ष्मीपुरीतील पोलीस वसाहतीतील ज्या खोलीमध्ये ही कांदबरी लिहीली गेली. त्या ठिकाणी बलकवडे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी बलकवडे बोलत होते. निर्धार प्रतिष्ठान, अक्षरदालन आणि मृत्युंजय प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संजयसिंह चव्हाण म्हणाले की, सावंत यांच्या सहवासामध्ये काही वेळ घालविण्याची मला संधी मिळाली. या कादंबरीमुळे भारावलेल्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी आहोत. कै. सु. रा. देशपांडे यांनीही कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करून ठेवल्याचा मी साक्षीदार आहे.

समीर देशपांडे यांनी निर्धार प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन मंडळाच्या ५० लाखांच्या निधीतून आजरा येथे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृतिदालन येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल. या ठिकाणी सावंत यांच्या स्मृती जपण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रविंद्र जोशी आणि प्राचार्य जॉन डिसोझा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला राम देशपांडे, कृष्णा दिवटे, युवराज कदम, डॉ. कविता गगराणी, अमेय जोशी, सुरेश मिरजकर, नारायण बेहेरे, वासिम सरकवास, चंद्रकांत सावंत यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.

माझ्या करिअरसाठी मृत्युंजय ठरली प्रेरक

शैलेश बलकवडे म्हणाले की, माझे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले. मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आणि झालो पोलीस अधिकारी. परंतु माझ्या युपीएससीच्या आधी मी मृत्युंजय वाचली. त्या काळात माझ्या मनाची व्दिधा अवस्था संपवण्याचे काम या कादंबरीने केले. पुढे वाटचाल करण्यासाठी मनाची बैठक तयार करण्याचे काम  करून ही कांदबरी माझ्या करिअरसाठी प्रेरक ठरली.