पुणे (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जाऊन कोरोनावरील लस निर्मितीचा आढावा घेतला. सुमारे सव्वा तास नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होते.

नरेंद्र मोदी यांचं आज दुपारी वायुसेनेच्या विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झालं. या वेळी ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे स्वागतासाठी उपस्थित होते.

“सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लसीचे काम कुठवर आलं आहे, याची माहिती त्यांनी दिली. तसंच, लस निर्मितीचं नियोजन कसं आहे, याचीही माहिती घेतली,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आणि मालक अदर पूनावाला यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही यावेळी हजर होते.

तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क या कंपनीला भेट दिली. अहमदाबादनंतर ते दुपारी हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीत जाऊन लसीबाबत माहिती घेतली.