वाराणसी (वृत्तसंस्था) : कृषी विधेयकांसंदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. कृषी विधेयकांसंदर्भात प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. मात्र, अनेक वर्ष शेतकऱ्यांचा छळ करणारेच आता कृषी कायद्यांविरोधात गैरसमज पसरवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते आज (सोमवार) वाराणसीत बोलत होते.

दिल्लीच्या सीमेवर नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. त्याबाबत मोदी म्हणाले की, मागील काही वर्षांपासून देशात वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. सरकारचा एखादा निर्णय एखाद्या व्यक्तीला, समाजाला, समूहाला पसंत पडला नाही तर विरोध होत असे. मात्र काही काळापासून, विरोधाचा आधार सरकारचा निर्णय नसतो. संभ्रम निर्माण करून वावड्या उठवणं हा विरोधाचा उद्देश दिसतो. भविष्यात असं होईल असे दावे केले जातात. अपप्रचार केला जात आहे. निर्णय योग्य पण यामुळे भविष्यात काय काय होईल असं सांगितलं जातं. समाजात भ्रम पैदा केला जात आहे. कृषी सुधारणांबाबतीत जाणीवपूर्वक हे केलं जात आहे. ही तीच माणसं आहेत ज्यांनी अनेक दशकं शेतकऱ्यांचा छळ केलाय, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणली आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या या विधेयकांमुळे मान्य होतील हे तुम्हाला दिसेल. प्रसारमाध्यमं मुद्यावर योग्य चर्चा घडवून आणतील अशी आशा आहे. एका राज्यात तर राजकीय स्वार्थासाठी सरकार शेतकऱ्यांना त्यांचे फायदे मिळवून देत नाहीये. हीच माणसं पीएम किसान सन्मान निधीच्या संदर्भात प्रश्न विचारत होती. हीच माणसं अफवा पसरवतात की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन हजार रुपये दिले जात आहेत. निवडणुकीनंतर हे पैसे व्याजासह परत द्यावे लागतील. मात्र, देशातल्या दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये थेट रक्कम जमा होते आहे. आतापर्यंत एक लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत. बाजारसमित्या आणि एमएसपी यांना हटवायचं असतं तर याच यंत्रणांना बळकट करण्यासाठी इतकी गुंतवणूक केली असती का, असा सवालही त्यांनी केला.