कळे (प्रतिनिधी) : गवशी (ता. राधानगरी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून तरुणास मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी राधानगरी पोलीस योग्य पद्धतीने तपास न करता आरोपींना पाठीशी घालत आहेत. तर फिर्यादीला आरोपीसारखी वागणूक देत आहेत. आतापर्यंत फक्त दोनच आरोपी अटकेत असून सूत्रधार मात्र मोकाट फिरत आहेत. राधानगरी पोलीस राजकीय दबावाला बळी पडत आहेत, असा आरोप गवशी (ता. राधानगरी) येथील फिर्यादी कृष्णा विष्णू पाटील यांनी केला आहे. राधानगरी पोलिसांनी नि:पक्षपातीपणे तपास करावा अथवा तो स्वत:कडे घ्यावा यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

गवशी येथे २४ जानेवारी रोजी निवडणुकीच्या वादातून संजय विष्णू पाटील (वय ३१) यास काठ्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानुसार राधानगरी पोलिसात विष्णू पाटील (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद शंकर केसरकर (वय २२) व संजय भिकाजी खोडके (वय ३५) या दोघांना अटक केली होती. परंतु यातील मुख्य सूत्रधार मोकाटच असून राधानगरी पोलीस त्यांची पाठराखण करीत आहेत. गंभीर जखमी झालेल्या संजय पाटील यांचे कडुन दवाखान्यात असताना बळजबरीने जबाब नोंदवून व मुख्य सूत्रधाराचे नाव गोपनीय ठेवण्याची धमकी पोलिसांनी दिल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले.

त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास तत्काळ अटक करून आरोपींना कडक शासन व्हावे व आम्हाला पोलिसांकडून न्याय मिळावा, अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली.