टोप (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिये येथे आज (गुरुवार) शेतकरी संघटनेच्या वतीने शियेफाटा ते निघवे मार्गावर क्रशर परिसरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. तसेच संबंधित विभागाने तात्काळ खड्डे न मुजवल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. माणिक शिंदे यांनी दिला.

शिये फाटा ते निघवे राज्यमार्गावरून रत्नागिरीकडे जाण्यासाठी सोईस्कर मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ आहे. पण या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी शेतकरी संघटनने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मुरमीकरण आणि खडीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही हे खड्डे मुजवले नसल्याने आज शेतकरी संघटनेच्यावतीने भर पावसामध्ये वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी बाबासो गोसावी, धनाजी चौगले, के. बी. खुटाळे, संदीप माळी, संदीप पाटील, तानाजी चव्हाण, महादेव चोपदार, कार्यकर्ते उपस्थित होते.