टोप (प्रतिनिधी) : कोरोनाची लस एकाचवेळी सर्वापर्यंत पोहोचवणं शक्य नाही. त्यामुळे शासनाने तीन टप्यात लस देण्याचे नियोजन  केले असून पहिल्या टप्यात आरोग्य सेवकांना ही लस देण्यात येणार आहे. शासनातर्फे लस मोफत देण्यात येणार असल्याची माहिती हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी दिली. टोप ग्रामपंचायत भेटीदरम्यात ते बोलत होते.

ते म्हणाले  की, लस देण्यासाठी ट्रेनिंग देण्यात आले असून गावामध्ये बुथ केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्यात पोलीस, होमगार्ड यांना लस देण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्यात ६० वर्षे वयाच्या वरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीचा  कोणताही साईट इफेक्ट नसल्याचे तज्ज्ञांचे  मत असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.

दरम्यान,  टोप आरोग्य उपकेंद्राची स्वच्छता तसेच डागडुजी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  यावेळी टोप उपकेंद्रात सीएसओ म्हणून रुजू झालेल्या डॉ. प्रिती दातीर यांचे स्वागत सरपंच, उपसरपंच यांनी केले. येत्या सहा महिन्यांत  टोप उपकेंद्रात अत्याधुनिक  सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे  आश्वासन ग्रामविकास अधिकारी डी. आर.देवकाते यांनी दिले.

यावेळी सरपंच रुपाली तावडे,  उपसरपंच संग्राम लोहार, विश्वास कुरणे,  राजू कोळी, आयेशाबी मुल्ला, अंजना सुतार,  रंजना पाटील,  शिरोलीचे आरोग्य सहाय्यक  ए.एस.पाटील,  आरोग्यसेवक  एस.आर.कांबळे  आदी उपस्थित होते.