इतर ठिकाणीही सांगली-जळगावप्रमाणे करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन : शिवसेना

0
84

मुंबई (प्रतिनिधी) : सांगली-जळगावात भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात, असा इशारा शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे.

सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, घाऊक पक्षांतरे करून भाजपने महाराष्ट्रात पक्ष उबदार व गुबगुबीत केला, पण त्याचा पाया भक्कम नव्हता, हे आता दिसून आले आहे.  सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपाच्या १७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या २७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे. 

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. भारतीय जनता पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. खडसे यांनी भाजप सोडला त्यामागची जी कारणे आहेत त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच. जळगाव भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. महानगरपालिका निवडणुकीत इकडचे तिकडचे लोक फोडून महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपाला घेऊन बुडाला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.