परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

0
438

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सर्व शाळांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा, शाळेने केलेल्या तयारीची पाहणी महानगरपालिकेकडील नियंत्रण अधिकारी समक्ष भेट देऊन करतील, नंतरच शाळा सुरू करण्याबाबतची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळामध्ये सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे शहरातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांची ऑनलाईन बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त निखिल मोरे, प्रशासन अधिकारी शंकरराव यादव यांच्यासह शहरातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक/प्राचार्य सहभागी झाले होते. शाळा सुरू करण्याची कसलीही घाई न करता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची तयारी पूर्ण करा, असे स्पष्ट करुन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शहरातील सर्व शाळामधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर तपासणी पूर्ण करणे, सर्व शाळा व परिसराचे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेचे कामही पूर्ण करणे तसेच पालकांची लेखी संमती घेणे या गोष्टी महत्वाच्या असून त्यांची परिपूर्ण तयारी करावी. पालकांची लेखी संमती घेताना ती अधिकृत असावी, शाळेच्या वेळेबाबतही पालकांना माहिती देणे, याविषयी शिक्षक व पालक सभेत सविस्तर चर्चा करुन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.