कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपोवन मैदानाची पाहणी केली.
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राजेश क्षीरसागर म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आदी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्यावयात. मैदानावर व व्यासपीठावर विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करा. प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था करा, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, कडक उन्हाळा व पाऊस लक्षात घेऊन मंडपाची आखणी, नागरिक, लाभार्थी व मान्यवरांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कार्यक्रमस्थळी एलईडी स्क्रीनची व्यवस्था, प्रवेशद्वारावर संरक्षण स्कॅनर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व अन्य आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. नागरिक व अतिथींच्या वाहनांकरिता स्वतंत्र वाहनतळ करा, अशा सूचना केल्या.
कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येत असून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. नागरिकांची व वाहनांची संख्या विचारात घेऊन याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून, आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली.