पुणे (प्रतिनिधी) : वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना आज (शनिवार) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्थानबद्ध (नजरकैद) केले आहे. पोलिसांसोबत बंडातात्या आता गाडीमधून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांच्या या कारवाईने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी-पंढरपूर चालत जाणारच, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते.

आज सकाळी पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नजरकैद केले. त्यांनी दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात मुक्काम केला होता. त्यानंतर यांच्या समर्थक वारकऱ्यांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात केली होती. आंदोलनाची परिस्थिती असतानाच आमदार महेश लांडगे याठिकाणी दाखल झाले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस यांच्यासह पदाधिकारी- कायकर्ते उपस्थित होते.

पायी चालणे हा गुन्हा असेल, तर रोज तसे लाखो गुन्हे दाखल करा. सर्व सामान्य नागरिकाचा पायी चालणे हा हक्क कोणतेही सरकार काढू शकत नाही अशी भूमिका बंडातात्या कराडकर यांनी घेतली होती. त्यामुळे आंदोलन होण्याची शक्यता असतानाच भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी आ. महेश लांडगे यांनी बंडातात्या, वारकऱ्यांसह प्रशासनाबरोबर मध्यस्थी केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडली. दोन तास झालेल्या चर्चेनंतर अखेर बंडातात्या यांनी गाडीतून पंढरपूरला जाण्यास होकार दर्शवला.