वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) :  किडनी निकामी झालेल्या जगातील लाखो लोकांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी आता नवीन पद्धत शोधली आहे. ज्यामुळे जगातील लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेत जगात प्रथमच मानवी शरीरात डुकराची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ही शस्त्रक्रिया न्यूयॉर्क शहरातील एनवाययू लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील डॉक्टरांनी केली आहे. प्रत्यारोपणानंतर डुक्कराची किडनी रुग्णाच्या शरीरात योग्यरित्या कार्य करत असल्याचंही समोर आलं आहे. ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी, ज्या रुग्णाला डुकराची किडनी प्रत्यारोपण केली गेली तो रूग्ण ब्रेन डेड होता. त्याचे हृदय आणि इतर अवयव अजूनही कार्यरत आहेत. त्या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची परवानगी घेतल्यानंतर ही दीर्घकाळ शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले.

तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी स्पेशल मोडिफाइड जीन असलेल्या डुकराचा वापर केला. त्या डुकराच्या पेशीमध्ये असलेली साखर काढून टाकण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला टाळण्यासाठी काही अनुवांशिक बदल करण्यात आले. यानंतर त्याची किडनी काढून ती ब्रेन-डेड रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केल्याचे त्यांनी सांगितले.