महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

0
27

महाज्योती फेलोशिप २०२२-२३ साठी नोव्हेंबर २०२२ मध्ये अवॉर्ड पत्र घोषित करुनही अद्याप फेलोशिपचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. पीएच.डी. करणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपया देखील जमा झाला नसल्याचे समोर आले आहे. तब्बल बाराशेपेक्षा अधिक विद्यार्थी पाच महिन्यांपासून फेलोशिपची रक्कम दर महिन्याला कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. 

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने ओबीसी आणि व्हीजेएनटी वर्गातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती फेलोशिप (अधिछात्रवृत्ती) देण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये २०२२-२३  च्या फेलोशिपसाठी अर्ज भरण्यात आले. त्यानंतर सरकार बदलले नव्या सरकारने पुन्हा विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेतले. नोव्हेंबर २०२२ मध्ये या फेलोशिपसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी केली. त्यांना अवॉर्ड लेटर देण्यात आले.

पाच महिन्यांपासून बाराशेपेक्षा अधिक विद्यार्थी फेलोशिपचे रक्कम दर महिन्याला कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत, जेणेकरुन पीएचडी करत असताना विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अर्थसहाय्य होईल. मागासवर्ग आणि बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करुन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर निर्णय होत नाही. पीएच. डी. साठीच्या पाच वर्षांसाठी ही फेलोशिप देण्याचा निर्णय या योजनेंतर्गत घेण्यात आला होता. त्यामध्ये पहिल्या दोन वर्षी विद्यार्थ्यांना प्रति महिने ३१ हजार अधिक एचआरए तर पुढील तीन वर्षांसाठी प्रति महिना ३५ हजार अधिक एचआरए अशी फेलोशिप राज्य सरकारकडून देण्यात येणार होती.

या आधीच्या वर्षी अर्ज केल्या विद्यार्थ्यांनासुद्धा अद्याप फेलोशिप मिळाली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. राज्य सरकारकडून या महाज्योती फेलोशिपची मोठी जाहिरात करण्यात आली. शिवाय तितकीच मोठी घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात फेलोशिप देण्यासाठी टाळाटाळ राज्य सरकार करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

हेच का माराष्ट्राचे गतिमान सरकार? असा सवाल पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी व्हावी. जेणेकरुन आम्हाला या फेलोशिपचा फायदा घेता येईल आणि आमचे संसोधन कार्य अधिके वेगाने आणि चांगल्या प्रकारे करु शकतो, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत.