पेट्रोल दरवाढीची शंभरीकडे वाटचाल

0
82

मुंबई (प्रतिनिधी) :  वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना ऐन थंडीत चटके बसू लागले आहेत. त्यातच आज (मंगळवार) तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैसे वाढ केली. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ९३.८३ रुपये झाला आहे. तर डिझेल ८४.३६ रुपये झाले आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात तेलाच्या किमती ६० डॉलरवर गेल्या आहेत. लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ०.७७ डॉलरने वाढून ५८.२२ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १.२२ डॉलरने वधारला आणि ६०.५६ डॉलर झाला आहे.  सलग तीन दिवस इंधन दर स्थिर होते. तर गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३० पैसांची वाढ झाली होती. तर गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल ३५ पैशांनी महागले होते. त्याआधी ८ दिवस इंधन दर स्थिर होते.