नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात १५ वर्षांपेक्षा कमी किंमतीवर गेलेले कच्च्या तेलाचे दर आता कोरोना लस येण्याची चाहूल लागताच कमालीचे वाढू लागले आहेत. २०२१ मध्ये ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरविण्यासाठी ३० नोव्हेंबर, १ डिसेंबरला बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर ४० वरून ४५ डॉलरवर पोहोचले आहेत.

याचाच परिणाम गेल्या आठवडाभरापासून पहायला मिळाला असून, देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. २०२१च्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किंमती या ५८ डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त वाढणार आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या ४८ दिवसांपासून देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र,गेल्या पाच दिवसांपासून या किंमती सतत वाढू लागल्या आहेत. सरकारी पेट्रोलिअम कंपन्यांनी आज (मंगळवार) पेट्रोल सहा पैशांनी वाढविले आहे. तर डिझेल १७ पैशांनी वाढले आहे.

महाराष्ट्रात ६० दिवसांनी दरवाढप्राप्त आकडेवारीनुसार गुरुवार,१९ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली नाही. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढताच गुरुवारी मध्यरात्रीनंतर कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढविल्या. शुक्रवार,२० नोव्हेंबरला पेट्रोल प्रति लिटर ८८.४५, डिझेल ७७.६७ रुपये विकल्या गेले. पूर्वीच्या आकडेवारीनुसार १९ सप्टेंबरला पेट्रोलचे दर ८८.३७ रुपये होते. तर २१ सप्टेंबरला ८ पैशांची घसरण होऊन ८८.२९ रुपयांवर स्थिरावले. त्यानंतर २० नोव्हेंबरला पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी वाढले आहे.