नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर भडकल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यानी गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली. दुसरीकडे विना अनुदानित गॅस सिलेंडर दरातही २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आताची दरवाढ आणखी हैराण करणारी ठरणार आहे.

जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर ५९ डॉलर्स प्रती बॅरलवर पोहोचले आहेत. त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याने पेट्रोल-डिझेल दरात वाढ करावी लागत असल्याचे तेल कंपन्याकडून सांगण्यात आले आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर ८६.६५ रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दर देखील ३५ पैशांनी वाढून ७६.८३ रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे ९३.२० आणि ८३.६७ रुपयांवर गेले आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यानी विना अनुदानित गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरचे दर ७१९ रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकाता येथे हेच दर ७४५.५० रुपयांवर गेले असून मुंबईत ते ७१० रुपये तर चेन्नईमध्ये ते ७३५ रुपयांवर गेले आहेत.