बंडखोर आमदारांवर कारवाईसाठी याचिका दाखल

0
195

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याने त्यांनी या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी मध्य प्रदेशमधील महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा जया ठाकूर यांनी एका याचिकेद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच कसा सुटणार, याकडे लक्ष लागलेले असताना आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. महिला काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी महाराष्ट्रातील राजकीय बंडाचा संदर्भात देत याचिका दाखल केली आहे. ठाकूर यांनी पक्षांतर बंदी कायद्यावर पुन्हा एकदा बोट ठेवले आहे.

सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या जया ठाकूर यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करणाऱ्या आमदारांचा संदर्भ देत दोषी ठरणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पक्षांतर करणाऱ्या आमदारांना पाच वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, असे आदेश द्या. शिवसेना आमदारांचा पक्षांतराचा प्रयत्न अयोग्य आहे, कारण ते दोन तृतीयांशपेक्षा कमी आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे.

जया ठाकूर यांनी यापूर्वी पक्षांतरासंदर्भात २०२१ मध्येच एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल येणे प्रलंबित आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असूनही केंद्र सरकारने पक्षांतर प्रकरणात अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत, असे ठाकूर यांनी या याचिकेत नमूद केले.

याचाच फायदा घेऊन देशातील राजकीय पक्ष आणि बंडखोर स्वार्थी आमदार देशातील विविध राज्यातील निवडून आलेली सरकारे सातत्याने पाडत आहेत. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाचे महत्त्व आणि सुशासन राहण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य स्थिरता आवश्यक असते, असेही त्यांनी म्हटले आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा फटक्यातून वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे ३७ आमदार फोडावे लागणार आहे. सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडून ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा केला जातोय. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडे ते अजून सिद्ध झालेले नाही.